Categories

सहजशिक्षणाच्या वाटेवर……..

< All Topics

“अहो बाई, ती गौरी, तिचे पालक तिला शाळेत पाठवतच नाहीत. काय तर म्हणे होमस्कूलिंग करणार
आहेत.” शाळेतील एका विभागाच्या प्रमुख मला सांगत होत्या. “ असे एकूण पाच विद्यार्थी झालेत आता.
शाळेतच येत नाही. अशाने शाळा कशा चालायच्या.” बाई जुन्या शिक्षिका. अनेक वर्ष शिक्षिकी पेशा केला
असल्याने त्यांची या सगळ्या प्रकाराबद्दल नाराजी होती. “अहो असं काय ? शाळेत जे होतं ते घरी कसं
होणार ? पालकांचा आपला काहीतरी अट्टाहास.” मी त्या क्षणी कोणाचीच बाजू घेतली नाही.
शाळेमुळे(स्कूलिंग) मुलांचं खूप नुकसान होतंय. मुलांना त्यांच्या वृत्तीने आणि पध्दतीने शिकण्याचा वेळ
आणि अवधी शाळा देत नाही. सगळे एका सुपात पाखडले जातात. ही आणि अशाप्रकारची अनेक मतं
आपण ऐकत असतो. हे सगळं अगदी खरं असलं तरी होमस्कूलिंग किंवा डिस्कूलिंग करणं सगळ्यांनाच शक्य
नाही. मुख्य म्हणजे त्यात नेमकं काय करायचं हे पालकांसाठी संभ्रमात पाडणारं ठरु शकतं. तसंच हे खूप
जबाबदारीचं आणि शिकवण्याच्या वळणावर न जाता पेलायचं आव्हान आहे याची जाणीवही पालकांना
असायला हवी. एकूण मुलांच्या सहजप्रवृत्तींना फुलवत नेणारी वाट तयार करणं सगळ्यानाच जमण्यासारखं
नाही.
“अरे, हा बघ आवाजाच्या दिशेने कशी मान वळवतोय.” “आई कुठे ते बरोबर कळतं पठ्ठ्याला.” “हा शब्द
हिला कसा माहित झाला ?” हे आणि असं बरचं काही आपण शून्य ते तीन वयोगटातील मुलांबाबत सतत
म्हणतं असतो, ऐकत असतो. मूल सहज या सगळ्या गोष्टी करत असतं. ही वर्ष एखादं कौशल्य त्याने कसं
प्राप्त केलं, ते त्याला कधी यायला लागलं याबाबत सतत आपल्याला आश्चर्यचकित करुन सुखद धक्के देणारी
असतात. त्यात आपला मोठ्यांचा काय वाटा? तर शून्य. आपण या गोष्टी त्याला शिकवल्याशिवाय येणारच
नाहीत असं नसतं. मग तरी पण आपण ज्या देतो, त्या अतिशय महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे ‘मोकळीक’.
कुठलीही अपेक्षा न बाळगता ‘प्रेमळ वातावरण’. तसचं या कृती ती त्या त्या टप्प्यावर सहज करु शकतील
याबद्दलचा ‘विश्वास’. हे मी सर्वसाधारण मुलांबाबत म्हणत आहे.
पण मग ही मोकळीक, त्यांच्यावरचा विश्वास, हा सहजपणा शाळेच्या वाटेवर का हरवतो? बोचणारे काटे
कुठून त्यांच्या वाटेवर आपल्याकडून पसरवले जातात ? मुलांमधील शिकण्याची नैसर्गिक प्रवृत्ती न कळत
कशी आणि केव्हा हिरावून घेतली जाते, या आणि अशा सारख्या प्रश्नांची उत्तरे आपल्याला शोधावी
लागणार आहेत. यासाठी शाळेत जास्तीत जास्त सहज शिक्षणाला वाव देणं हा मार्ग वाटत आहे. सहज
शिक्षणाची व्याख्या करायची म्हटली तर असं म्हणता येईल की, जगण आणि शिकणं यांची सांगड घालता
येणं. मुलांच्या नैसर्गिक शिकण्याच्या वृत्तीला वाव देणं. या सहज शिक्षणाला शाळेच्या वाटेवर वाव कसा
देता येईल, या विचाराचा मागोवा घेत शाळेमध्ये माझे सहजशिक्षणाचे प्रयोग सुरु झाले.
मागे एका कॉलेजचे प्राध्यापक बालशिक्षणाच्या एका कार्यक्रमात बोलत होते. तेव्हा ते म्हणाले, आपल्या
शिक्षणाच्या प्रवासात असं काय होतं की तुमच्य़ासमोर नविन नविन गोष्टी आत्मसात करण्यासाठी
आसुसलेली, सतत प्रश्न विचारणारी मुलं आमच्याकडे येईपर्यंत पूर्ण बंद होऊन जातात ? सांगितल्याशिवाय
स्वतःहून कृती करण्याची प्रवृत्ती हरवून बसतात ?
याची उत्तर मुलांची शिकण्याची नैसर्गिक प्रवृत्ती म्हणजेच सहज शिक्षणाची प्रवृत्ती हरवून बसण्यात आहे.
अगदी पूर्व प्राथमिकपासून कुठल्याही वर्गात “बाई, आता काय करायचं ?” हा सहज आणि सर्रास विचारला
जाणारा प्रश्न असतो. त्यात आपल्यालाही काही वावग वाटत नाही. पूर्व प्राथमिक विभाग हा पूर्णपणे
कृतीयुक्त पध्दतीनेच जाणारा असतो किंवा तसा अपेक्षित असतो. मुलांचा भाषाविकास, बौध्दिक विकास,
स्थूलस्नायू विकास, सूक्ष्म स्नायू विकास, कला विकास, सामाजिक व भावनिक विकास साधण्यासाठी विविध

कृतींची नियोजनबध्दरितीने आखणी केली जाते. संपूर्णपणे अनुभवाधारित शिक्षण देण्याचाच या विभागाचा
उद्देश असतो. एकूण या विभागात आपण नेहमीच असं अभिमानानं म्हणतो, की हसतखेळत शिक्षण हेच
आमचं ध्येय आहे. तसचं इथे आम्ही कृतीयुक्त शिक्षणाचीच कास धरतो असंही सांगतो. पण हे सगळं जरी
खरं असलं तरी आपण आपल्याला हव्या त्याच कृती मुलांना करायला देतो. त्यात काय करायच हे आपणच
ठरवतो. त्यातून काय साध्य व्हायला पाहिजे त्या ध्येयापर्यंत नेतो. भाषाविकास साधताना श्रवण
कौशल्यामध्ये सूचना पालन हे महत्त्वाचं मानतो. असं सगळं झक्कास जमलं की स्वतःला एक उपक्रमशील
शिक्षक म्हणवून घेतो. पण यामुळेच मुलं बंद होत जातात हे आपल्याला सहज जाणवत नाही. त्यात काय
चुकीचे हीच आपली भूमिका असते.
सहज शिक्षणाच्या नविन प्रवासात म्हणता म्हणता माझ्यातल्या शिक्षकाला आपली भूमिका बदलायची
किती नितांत गरज आहे हे जाणवू लागले. सहजशिक्षणाच्या माझ्या रोजच्या प्रयोगात मुलांची त्यांनीच
शोधून काढलेली कामं एक निरिक्षक म्हणून विचारांना चालना देणारी ठरायला लागली आहेत. त्यातून ती
काय शिकत आहेत याचं निरिक्षण करत अभ्यास करायला प्रवृत्त करणारी ठरत आहेत. मुलांच्या स्वतःच्या
स्वतः गोष्टी शिकण्यावर न कळत आपण बंधनं घालतो हे समजायला लागलं आहे. मुख्य म्हणजे एक शिक्षक
म्हणून सारख्या सूचना करण्याची, सगळं अगदी मूळापासून समजवत बसण्याची अजिबात गरज नसते, हा
वाटायला सोपा पण आचरणात आणायला फार कठीण असा विचार पचायला लागला. शहरी वातावरणात
आणि भागात, ‘सहज शिक्षण आणि शाळा’ याची सांगड घालत एका सुंदर प्रवासाला सुरुवात केली आहे.
सहजशिक्षणाच्या वाटेवर चालताना, मुलांसाठी जाणीवपूर्व आखलेल्या अनेक उपक्रमांचा पोकळपणा आता
कळायला लागला आहे असं मी धाडसानं म्हणू शकते आहे. आताच्या या सुरु झालेल्या प्रवासात निश्चितच
मुलांच्या ‘काय करु ?’ या प्रश्नाचं मला वावगं वाटत आहे. का नाही मुलं त्यांना जे वाटतंय ते शाळेत करुन
दाखवू शकत? किती दिवस त्यांनी शिक्षकांनी दिलेलीच कृती करायची. किती दिवस आपण या भ्रमात
राहणार की त्यांना सारखी आणि सारखी शिक्षकांच्या मार्गदर्शनाचीच गरज आहे. त्याशिवाय त्यांना काही
जमणारच नाही. शिक्षकांनी शिक्षक असण्याच्या भूमिकेतून लवकरात लवकर बाहेर पडायला हवं हे
जाणवायला लागलं आहे.
या ‘ऑफबीट’ प्रवासातील सुंदर ठिकाणांविषयी संवाद साधायला नक्कीच आवडेल. त्यासाठी हा लेखन
प्रपंच. ही वाट सोपी वाटली तरी खूप अवघड आणि तितकीच रम्य. पुढील प्रत्येक लेखात याच प्रवासातील
प्रयोगांविषयी व त्या अनुषंगाने आपल्या मोठ्याच्या भूमिकेविषयी विचारांची देवाण घेवाण करता येईल.
मुलांची निर्णय क्षमता, कल्पनाशक्ती व तर्क क्षमता हे उपजत गुण विरुन न जाता त्याला खतपाणी देणारं
वातावरण या प्रवासात आपण नक्कीच निर्माण करु शकू अशी आशा आहे.

Previous Reimagining ART
Table of Contents